धुळे - कोरोनाच्या संकटात सरकारने विविध क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत जाहीर केली आहे. मात्र, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांसाठी तसेच वृत्तपत्र चालकांना पाठबळ मिळण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी धुळे शहरातील पत्रकारांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.
कोरोना आजाराच्या वैश्विक संकटात विविध क्षेत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. खासगी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कपात केली जात आहे. विविध क्षेत्राप्रमाणेच याचा फटका प्रसारमाध्यमांना देखील मोठ्या प्रमाणावर बसत असून, वृत्तपत्र प्रकाशित करणे कठीण झाले आहे. समाजातील विविध घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रसारमाध्यमे प्रमाणावर करत असतात. मात्र, कोरोना आजाराच्या वैश्विक संकटात वृत्तपत्र प्रकाशित करणे कठीण झाले असून, यामुळे अनेकांचे रोजगार धोक्यात आले आहेत.प्रसारमाध्यमांवर आलेल्या संकटाबाबत धुळे शहरातील विविध पत्रकारांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. यावेळी बोलताना शासनाने वृत्तपत्र सूक्ष्म लघु उद्योग म्हणून जाहीर करावे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी, पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे, अशी अपेक्षा यावेळी पत्रकारांनी व्यक्त केली. वृत्तपत्र विक्रेत्यांवर देखील गदा आली असून, वाचकांचा कल ई-पेपरकडे अधिक होत चालला आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन वृत्तपत्र व्यवसायिकांना देखील सरकारने मदत करावी, अशी मागणी यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सदाशिव सोंजे यांनी केली.