धुळे - धुळ्याकडून शिरपूरकडे विदेश मद्याची वाहतूक करणारी गाडी पलटताच मद्य शौकिनांनी मद्याच्या बाटल्या लुटल्याची घटना नागाव गावाजवळ शुक्रवारी घडली. मुंबई-आग्रा महामार्गावर नागाव गावाजवळील वैद्यकीय महाविद्यालयासमोर विदेश मद्याची वाहतूक करणाऱ्या गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्याने वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी पलटी झाली. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी पळवापळवी मात्र दिसून आली.
अपघात झाल्यानंतर गर्दी जमा झाली, मात्र गाडीत विदेशी मद्याच्या बाटल्या आहेत म्हटल्यावर जेवढ्या काय बसतील तेवढ्या हातात, खिशात, पिशवीत घालत हसतमुखाने अनेकांनी बाटल्यांची पळवापळवी केली. धुळ्याकडून शिरपूरकडे छोटा हत्ती वाहनातून मद्य नेत असताना नागावजवळ वाहनाचे टायर अचानक फुटल्याने वाहन चालकाचा ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला वाहन पलटी झाले.
मद्याची गाडी पलटी झाल्याचे समजल्यावर...
नागावजवळ मद्याची गाडी पलटी झाल्याची बातमी आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मग काय रस्त्याने येणाऱ्या ट्रक, मोटारसायकल चालकांसह गावकऱ्यांनी गर्दी करत मद्याच्या बाटल्या उचलून नेण्यास सुरुवात केली. एकटा वाहनचालक त्यांना विरोध करत असला तरी त्याचे लक्ष नसताना आणि गर्दी असल्याने नागरिकांनी बाटल्या उचलून नेल्याचे दिसून आले.
अशावेळी माणुसकी संपते
या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. मात्र, अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी गाडी चालकाची विचारपूस करण्याऐवजी फुक्कट सापडलंय म्हटल्यानंतर हात साफ करायला सुरुवात केली. चालक सर्वांना विनवण्या करून शेवटी काठी हातात घेऊन समजावत होता. मात्र, त्याच्याकडे दुर्लक्ष करत जमावाने बाटल्या घेऊन पळ काढला.