धुळे - सोनवद मध्यम प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचा अद्यापही मोबदला न मिळाल्याने धुळे तालुक्यातील धनूर येथील आत्माराम गजमल चौधरी या शेतकऱ्याने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.
धुळे तालुक्यातील मौजे धनूर येथील शेतकरी आत्माराम गजमल चौधरी यांच्या मालकीची मौजे लोणकुटे येथे (गट नंबर 33) शेतजमीन होती. ही जमीन १९८५ साली सोनवद मध्यम प्रकल्पासाठी शासनाने संपादित केली. त्यातील अतिशय अल्प जमीन आता आत्माराम चौधरी यांच्याकडे शिल्लक आहे. शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला अद्यापही आत्माराम चौधरी यांना मिळालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आत्माराम चौधरी हे आपल्या अल्पशा जमिनीवर शेती करतात. त्यातही सोनवद धरणाचे बॅक वॉटर त्यांच्या शेतात येत असल्याने त्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
याबाबत शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कोणताही न्याय न मिळाल्याने आज अखेर आत्माराम चौधरी यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. "माझा मुलगा अपंग असून मी कुटुंबाचा उदरनिर्वाह मोठ्या कष्टाने करीत आहे. याबाबत शासनाला वारंवार पाठपुरावा केला मात्र तरीही कोणतीही दखल न घेतली गेली नाही म्हणून मी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला" अशी भावना आत्माराम चौधरी यांनी व्यक्त केली.