धुळे - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तुषार रंधे यांची तर उपाध्यक्षपदी कुसुमताई निकम यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले असून दुपारी तीनला पार पडणाऱ्या विशेष सभेत या नावांची औपचारिक घोषणा होणार आहे.
परिषदेच्या 56 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने तब्बल 41 जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यासाठी शुक्रवारी (17नोव्हेंबरला) होणाऱ्या विशेष सभेत ही निवड होणार आहे.
शिरपूरमधून विजयी झालेले भाजपचे तुषार रंधे यांची धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच उपाध्यक्षपदी कुसुम निकम यांचे नाव निश्चित होणार आहे. निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर ही निवड बिनविरोध मानली जात आहे. तुषार रंधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.
कोण आहेत तुषार रंधे?
स्वातंत्र्यसेनानी, माजी आमदार तसेच अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष, व्यंकटराव रणधीर यांचे नातू म्हणून तुषार रंधे यांची धुळ्यात ओळख आहे. तर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आणि बोराडी ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वासराव रंधे यांचे चिरंजीव म्हणून देखील त्यांना ओळखतात.
तुषार रंधे यांचं बीएससी डिग्री शिक्षण झाले असून त्यांना डि-लीट ही पदवी देखील देण्यात आली आहे. कुटुंबातून मिळालेला सामाजिक आणि राजकीय वारसा तुषार रंधे ते चावलत आहेत. गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आणि शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून विविध संघटना तसेच विविध क्षेत्रातील समित्यांवर त्यांची निवड झाली आहे.