धुळे - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी धुळे तहसील कार्यलायत उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती.
मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या तसेच पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. येत्या ७ जानेवारीला धुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती आणि उर्वरित जिल्ह्यातील पाचही पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात सोमवारी उमेदवारांसह समर्थकांनी तहसील करण्यात प्रचंड गर्दी केली होती. यावेळी तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
तहसील कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजपच्या वतीने एकविरा देवी मंदिरात धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते नारळ फोडून, रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तसेच महाविकास आघाडीच्या वतीने देखील शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. धुळे जिल्ह्यात एकूण 56 गट आणि 112 गण आहेत. धुळे तालुक्यात 15 गट 30 गण, साक्री तालुक्यात 17 गट 34 गण, शिरपूर तालुक्यात 14 गट 28 गण तर शिंदखेडा तालुक्यात 10 गट 20 गण आहेत.