धुळे - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तुषार रंधे यांची तर उपाध्यक्षपदी कुसुम निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
हेही वाचा... 'सरकारविरूद्ध आंदोलन करताना केंद्र सरकार म्हणा कारण, राज्याचे सरकार तुमच्या सोबत आहे'
धुळे जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने तब्बल 41 जागांवर विजय मिळवला. यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शुक्रवारी होणाऱ्या विशेष सभेत या दोन्ही पदांसाठी निवड करण्यात आली. यावेळी भाजपकडून शिरपूर तालुक्यातून विजयी झालेले तुषार रंधे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी कुसुम निकम यांची निवड करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर ही निवड बिनविरोध झाली. दुपारी तीन वाजता झालेल्या विशेष सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा करण्यात आली. तुषार रंधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. तुषार रंधे यांची अध्यक्षपदासाठी एकमताने निवड करण्यात आली.
पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. जिल्हा परिषदेचा कारभार अधिक पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन तुषार रंधे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
हेही वाचा... वाडिया रुग्णालयाच्या भूखंडावर बड्या अधिकाऱ्यांचा डोळा - प्रविण दरेकर
कोण आहेत तुषार रंधे?
माजी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण महर्षी स्वर्गीय व्यंकटराव रणधीर यांचे तुषार रंधे हे नातू आहेत. तर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आणि बोराडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वर्गीय विश्वासराव रंधे यांचे ते पुत्र आहेत. तुषार रंधे यांचे बीएससी ॲग्रीकल्चर इतके शिक्षण झाले आहे. तसेच त्यांना डि.लीट. ही पदवी देखील देण्यात आली आहे. कुटुंबातून मिळालेला सामाजिक आणि राजकीय वारसा तुषार रंधे यांनी अविरतपणे पुढे चालवला.