धुळे - विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणारा गुरुच दुचाकी चोरीचा प्रमुख सूत्रधार निघाल्याने शिक्षकी पेशामध्ये खळबळ उडाली आहे. कंपनीच्या दुचाकी विक्रीचा व्यवहार करत मौजमजा करणारा व पेशाने शिक्षक असणाऱ्या नंदुरबार येथील संशयित शिक्षक आणि त्याच्या सहकाऱ्याला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून शहरातून वेगवेगवेगळ्या भागात चोरी केलेल्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितांकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.
शहरात काही दिवसांपासून दुचाकी चोरांनी हैदोस घातला आहे. बस स्थानक, सर्वोपचार रुग्णालय, खासगी रुग्णालये, स्वच्छतागृह, सिनेमा गृह, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालय व गर्दीच्या ठिकाणांहून नागरिकांच्या दुचाकी लंपास होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. नागरिकांमधील भीती आणि पोलीस प्रशासनाप्रती वाढता नाराजीचा सूर लक्षात घेता अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर अधीक्षक डॉ राजू भुजबळ यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांना मार्गदर्शन करत कारवाईचे आदेश दिले.
हिरे यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी यासह शोध पथकाला योग्य सूचना करत चोरी झालेल्या ठिकाणाची माहिती घेत परिसरातील सिसिटीव्ही कॅमेरा तपासणीसाठी ताब्यात घेतले. शहरात विविध ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनांमधील कॅमेऱ्यात कैद संशयित व दाखल गुन्ह्यात सराईत संशयित यात तफावत दिसून आल्याने संशयितांचा माग काढणे कठीण झाले होते. पोलिसांनी खबरींची मदत घेत अधिक तपास केला असता शहरातील गोकुळ नगर भागात राहणार ऋषिकेश रमेश गवळी (वय१९) याला संशयावरून ताब्यात घेतले. ऋषिकेश याने दिलेल्या माहितीवरून नंदुरबार येथे गवळी वाड्यातील रहिवासी व कंपनीच्या दुचाकी विक्रीचा व्यवसाय करणारा विजय शंकर गवळी (वय३०) याच्याबाबत माहिती मिळाली. विजय गवळी हा पेशाने शिक्षक असून चोरीच्या दुचाकी विकून मित्रांसमवेत मौजमजा करत असल्याची खात्री पथकाला झाल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेतले. विजय गवळी व ऋषिकेश यांनी चोरीची कबुली देत चोरीतील ७ मोटारसायकल पोलिसांच्या स्वाधीन केल्या.