धुळे - जिल्ह्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर स्पिरीटची हेराफेरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोनव जणांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून दोन टँकर व एक पिकअप अशा तीन वाहनांसह ८७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिसांना महामार्गावर टँकरमधून स्पिरीट काढून तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. सहाय्यक निरीक्षक अभिषेक पाटील यांनी मध्यरात्री सहकाऱ्यांसोबत महामार्गावरील सुळे फाट्यावर छापा टाकला. घटनास्थळी दोन टँकर व महिंद्रा पिकअप संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे आढळले. तेथील चार संशयितांनी पोलिसांना पाहून पळ काढला. टँकरवरून खाली उडी टाकण्याच्या प्रयत्नात एक संशयित जखमी झाला. त्याच्यासह अन्य एका संशयिताला पोलिसांनी पकडले. संशयित गुरूप्रीत महेलसिंग (३०, रा.नवापूर जि. बिजनावर, उत्तर प्रदेश) व संजीवकुमार भोजराजसिंग (४७, रा. ब्रम्हपुरी जि. मेरठ, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
जप्त केलेले टँकर अंबाला (हरियाणा) येथून चेन्नई (तामिळनाडू) येथे नेण्यात येत असल्याची माहिती संशयितांनी दिली. या कारवाईत ६० हजार लिटर स्पिरीट, दोन टँकर व एक महिंद्रा पिकअप असा एकूण ८७ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चारही संशयितांविरूद्ध सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.