धुळे Dhule Leopard News : मागील काही दिवसांपासून धुळे तालुक्यातील बोरी पट्ट्यात नरभक्षक बिबट्यानं दहशत माजवली आहे. आतापर्यंत या बिबट्यानं 2 जणांचा बळी घेतला असून एका बालकाला गंभीर जखमी केलं आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बालकांच्या वारसांना तातडीनं 25 लाख रुपये द्यावेत. तसंच त्या नरभक्षक बिबट्याला तत्काळ जेरबंद अथवा बेशुद्ध करावं आणि शक्य न झाल्यास ठार करावं, असे आदेश राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक महिपत गुप्ता यांना दिले आहेत. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची रेस्क्यू टीम सज्ज करण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे.
कुणाल पाटील यांनी घेतली होती भेट : बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी आमदार कुणाल पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. भेटीनंतर मुनगंटीवार यांनी बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. यावेळी कुणाल पाटील यांनी मंत्री यांच्या दालनातून नागपूर येथील राज्याचे मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक महिपत गुप्ता यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी बिबट्याला बेशुध्द करण्याचे आणि तसे शक्य न झाल्यास ठार मारण्याचे आदेश दिले असल्याचं सांगितलं.
पिंजरे, सापळा आणि रेस्क्यू : पुणे येथील वनविभागाचे व एनजीओचे पथक या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दाखल झाले असून त्यांचे शोधकार्य सुरू झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोघण, होरपाडा, बोरकुंड परिसरात वनविभागानं सुमारे 15 पिंजरे लावले आहेत. तर पुण्याहून 26 ऑक्टोबर रोजी रात्री 2.30 वाजता रेस्क्यू पथक दाखल होऊन त्यांनी तत्काळ सापळा लावला आहे. ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करुन बिबट्याचा शोध घेतला जात आहे. तसंच लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळेल,अशी खात्री रेस्क्यू पथकातील स्वयंसेवकांनी दिली आहे.
हेही वाचा -