धुळे - शहरात डेंग्यूचे 148 रुग्ण आढळून आले आहेत. तर, जवळपास 50 हजारांहून अधिक घरांमध्ये डेंग्यूसदृश डास आढळून आले आहेत, डेंग्यूला आळा घालण्यासाठी महापालिकेने 9 पथकं तयार केली असल्याची माहिती पालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिली.
हेही वाचा - पनवेल महानगरपालिकेची अनधिकृत आठवडी बाजारांवर कारवाई
धुळे शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या असून शहरात 472 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 148 रुग्ण हे पॉझीटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डेंग्यूला आळा घालण्यासाठी महापालिकेने 9 पथकं कार्यरत केली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. पथकाने केलेल्या तपासणीत 50 हजार घरांमध्ये डेंग्यूसदृश डास आढळून आले आहेत. शहरात डेंग्यूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे.