धुळे - हृदय पिळवटून टाकणारी घटना धुळ्यात घडली आहे. दिवाळीच्या दिवशीच सर्वत्र फटाके फोडून दिवाळीचा उत्सव सर्वजण आनंदात साजरा करीत आहेत. मात्र धुळे शहरातील जुने धुळे परिसरात एका तेरा वर्षीय मुलाने फटाके फोडत असतानाच स्टीलच्या ग्लासमध्ये फटाका फोडला. फटाका फुटताच या ग्लासचे तुकडे होऊन या मुलाच्या शरीरामध्ये घुसले. या ग्लासचे बारीक बारीक झालेले तुकडे शरीरात घुसल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
काल रात्री 10 वाजेच्या सुमारास सोनू जाधव या अल्पवयीन मुलाने फटाके फोडत असताना एका स्टीलच्या ग्लासामध्ये पेटलेला फटाका टाकला. त्यानंतर या फटाक्याचा बार झाल्यानंतर या स्टीलच्या ग्लासचे तुकडे हवेत वेगाने उडाले. या तुकड्यांपैकी काही तुकडे सोनूच्या अंगात देखील घुसले व त्यानंतर सोनू थोडे अंतर चालून जमिनीवरती कोसळला. त्याच्या नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी सोनुला मृत घोषित केले.
दिवाळीच्या दिवशीच अशा दुर्दैवी घटनेमुळे धुळे शहरातील सोनू जाधव या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्ती केली जात आहे.