धुळे - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकांची ही वाढती गर्दी कोरोनाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे.
गुरुवारपर्यंत आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील 5 आणि शिरपूर येथील 2 जणांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या 325 झाली आहे. आत्तापर्यंत 156 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 132 जणांवर उपचार सुरू आहेत.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे रुग्णांची संख्या वाढत आहे. दोंडाईचा गावात 11 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्य शासनाने ताळेबंदीत शिथिलता आणून नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरात मुख्य बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील कोरोनाबधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.