धुळे- अमळनेर येथील संभाव्य कोरोनाबाधिताची धुळ्यात कोरोना तपासणी करण्यात आल्यानंतर हा तरुण पॉझिटिव्ह असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले. मात्र, या कोरोनाबाधिताने रात्रीच धुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड मधून पळ काढला. या घटनेची माहिती समजताच आरोग्य यंत्रणा पुर्णतः हादरली आहे. अमळनेरच्या कोरोनाबधिताचा शोध घेतला असता हा रुग्ण त्याच्या मूळगावी अमळनेरमध्ये पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
शनिवारी रात्री उशिरा आढळून आलेल्या 18 कोरोनाबधितांपैकी 2 कोरोनाबाधित हे अमळनेर येथील होते. त्यात एक महिला तर दुसरा पुरुष रुग्ण होता त्यापैकी अमळनेरच्या कोरोनाबाधित रुग्णाने रात्रीतून धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड मधून पळ काढला.
पाच दिवसात दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाने पळ काढल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले. अखेर या रुग्णाच्या मूळगावी चौकशी करण्यात आल्यानंतर हा कोरोनाबाधित रुग्ण आपल्या मूळगावी अमळनेर येथे पोहोचला असल्याची माहिती समोर आली. या रुग्णास जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे धुळे शासकीय हिरे महाविद्यालयाचा निष्काळजीपणा बाहेर आला आहे.
धुळ्यातील शासकीय हिरे महाविद्यालयातून एका परप्रांतीय कोरोनाबाधिताने आपल्या गर्भवती पत्नी व चार वर्षांच्या बाळासह रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्ड मधून पळ काढला होता तो पळ काढलेला कोरोनाबाधित रुग्ण पाच दिवस उलटून देखील अजून पोलिसांना सापडला नाही.