धुळे - काँग्रेसचे अध्यक्ष तथा खा. राहुल गांधी यांची धुळ्यात जाहीर सभा पार पडली. काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केल्याची याची मी उदाहरणे दाखवतो, मात्र मोदींनी दिलेले एक तरी आश्वासन पूर्ण केले याचे उदाहरण तुम्ही दाखवा असं आवाहन करीत खा. राहुल गांधी यांनी विविध विषयांवरून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. धुळे शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर राहुल गांधींची सभा पार पडली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार तथा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची धुळे शहरात सभा पार पडली. या सभेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचार नारळ फोडला. शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर राहुल गांधींची सभा पार पडली. यावेळी खा. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, धुळे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार रोहिदास पाटील, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच धुळे आणि नंदुरबार येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. तत्पूर्वी आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही, असं सांगत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची वाहवा मिळवली. यावेळी सभेच्या सुरवातीला शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आज देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असून काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, याची उदाहरणेदेखील मी दाखवून देतो. मात्र, मोदींनी दिलेले एक तरी आश्वासन पूर्ण केले आहे का? याचे उदाहरण तुम्ही दाखवा, असे आवाहन खा राहुल गांधी यांनी यावेळी केले. तसेच नोटबंदीच्या वेळी सर्वसामान्य नागरिक रांगेत उभा होता. मात्र, नरेंद्र मोदी त्यात नव्हते. दहशतवादी हल्ला झाला त्यावेळीही काँग्रेस पक्ष सरकारसोबत उभा राहिला होता, असे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावेळी राहुल गांधींनी आगामी निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहनही केले.