धुळे - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार पक्षांतर होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबण्यास तयार नाही. आता धुळे जिल्ह्यातही काँग्रेसला हादरा बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिरपूर विधानपरिषदेचे आमदार अमरीश पटेल हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच त्यांच्यासोबत शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा हेदेखील भाजपात प्रवेश करणार करणार असल्याची माहिती मिळते आहे.
हेही वाचा - विलासराव देशमुखांचे दोन्ही चिरंजीव विधानसभेच्या आखाड्यात
२२ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आमदार अमरीश पटेल आणि काशीराम पावरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्यात विरोधी पक्षातले विविध लोकप्रतिनिधी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत आहेत. अमरीश पटेल यांनी आजवर आपल्या कार्यातून शिरपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवला होता. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातून काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे. अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तामुळे भाजपच्या गोटात आनंदाच वातावरण आहे. मात्र, या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरण कशी बदलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा - 'सेना-भाजप जागावाटपाचा फॉर्म्युला लोकसभेलाच ठरलाय'