धुळे - लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून कुणाल पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. कुणाल पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच धुळे ग्रामीण मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुणाल पाटील आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यात आता राजकीय सामना रंगणार असून यात कोणाचा विजय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कुणाल पाटील यांचे चुलत भाऊ उत्कर्ष पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला असून ते डॉ. सुभाष भामरे यांचा प्रचार करणार आहेत. उत्कर्ष पाटील यांचा धुळे लोकसभा मतदार संघात प्रभाव पडतो का, हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आता हालचालींना वेग दिला आहे. मंगळवारी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत धुळे लोकसभा मतदार संघातून तरुण उमेदवार आणि धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी तरुण उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता कुणाल पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात आता डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात राजकीय सामना रंगणार आहे. काँग्रेसकडून कुणाल पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले असतांना मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. उत्कर्ष पाटील यांच्या प्रचाराचा डॉ. सुभाष भामरेंना कितपत फायदा होतो आणि कुणाल पाटील यांना फटका बसतो हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे.