धुळे - दोंडाईचाहून धुळ्याला जाणाऱ्या एका कारमधून दारूची चोरटी वाहतूक होत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. कारच्या पुढील काचेवर संपादक एमएच टीव्ही असे लिहिले असल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली असून कारसह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर टोल प्लाझाजवळील हॉटेल भाग्यश्रीजवळ सापळा रचला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, अतुल निकम त्याठिकाणी हजर झाले. यावेळी पोलिसांना पांढऱ्या रंगाची इंडिगो कार वेगाने येताना दिसून आली. तिला थांबवले असता कारमध्ये चार संशयित आढळून आले.
कारच्या डिक्कीत 50 हजार 172 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या विविध प्रकारच्या बाटल्या आढळून आल्या. प्रकरणी राजेश सुभाष अग्रवाल, देवेंद्र दत्तात्रय सोनार, चंद्रकांत भिका चौधरी, सतीश नेमीचंद सोनपुरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारचा मालक कोण आहे तसेच त्याचा या गुन्ह्यात काही सहभाग आहे का, याची चौकशी सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदेसिंग चव्हाण याबद्दल अधिक तपास करीत आहेत.