मुंबई/धुळे - शिरपूर येथील एमआयडीसीत असलेल्या एका केमिकल कंपनीत स्फोटात १५ कर्मचारी ठार झाले असून ४८ जण जखमी त्यातील १८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. आपल्या ट्वीटर हँडलवरून त्यांनी ही मदत जाहीर केली.
देवेंद्र फडणवीस सध्या नांदेड येथील महाजनादेश यात्रेत असून त्यांनी घटनास्थळी सर्व मदत पोहचवत असल्याचे सांगितले आहे. अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून यामुळे संपूर्ण शिरपूर तालुका हादरला आहे. मृतांमध्ये ९ महिन्याच्या मुलाचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याजवळ असलेल्या वाघमोडे गावाजवळ एमआयडीसी आहे. या एमआयडीसीत असलेल्या एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण शिरपूर तालुका हादरला असून या स्फोटामुळे धुराचे लोट उंचच-उंच जात होते. हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीच्या आजूबाजूच्या गावांनाही स्फोटचा हादरा बसला आहे. कंपनीजवळील शेताती काही जनावरेही या स्फोटामुळे दगावली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील शाळा महाविद्यालयाला प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे.