धुळे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा राष्ट्रवादीभवन येथे बुधवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी शिंदखेडा मतदार संघातील उमेदवारीवरून माजी जिल्हा परिषद सद्स्य ललित वारुळे आणि माजी सरपंच सुनील लांडगे यांच्यात वाद सुरु झाला. दरम्यान, दोघांचेही समर्थक एकमेकांवर धावून गेल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्षांच्या हालचालींचा वेग वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी धुळे जिल्हा राष्ट्रवादीभवन येथे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींसाठी निरीक्षक म्हणून उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे यांनी आपणास विधानसभा उमेदवारी का मिळावी? याबाबत भूमिका मांडत असताना माजी सरपंच सुनील लांडगे यांनी हरकत घेतली. यावरून ललित वारुळे आणि माजी सरपंच सुनील लांडगे यांच्यात वाद उफळला. यावेळी दोघांचे समर्थकही परस्परांवर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. मात्र, वरिष्ठांनी वेळीच हस्तक्षेप करत दोघांना थांबवले. उमेदवारी देण्याचा निर्णय हा वरिष्ठांचा असून आपण वाद घालू नये असे आवाहन निरीक्षक उमेश पाटील यांनी यावेळी केले.