धुळे - खान्देश कुलस्वामीनी श्री एकवीरा देवी मंदिर परिसरात चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अर्थात गुढीपाडव्यापासून यात्रोत्सवाला सुरुवात होते. परंतु, यंदाही करोनाचे सावट असल्यामुळे यात्रोत्सव होणार नाही. भाविकांनी घरीच साध्या पध्दतीने कार्यक्रम करावेत,ज्यांच्या घरी लहान मुलांचे जावळ असतील त्यांनी घरीच आरती लावून जावळ काढावेत व नंतर देवीच्या चरणी अर्पण करावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केले आहे. मंदिरात साध्या पध्दतीने गुढी उभारण्यात आली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
यावेळी सोमनाथ गुरव म्हणाले की, मंदिरात गुढीपाडव्याच्या दिवशी ध्वजारोहण केले जाते. तसेच भाविकांच्या उपस्थितीत गुढी उभारली जाते. त्यानंतर वर्षभर या ध्वजाखाली विविध धार्मिक कार्यक्रम होतात. पण, यंदा सलग दुसऱ्यांदा करोनामुळे धार्मिक कार्यक्रम होऊ शकलेले नाहीत. शिवाय चैत्र मासारंभानिमित्त या ठिकाणी भरणारा यात्रोत्सव यंदाही रद्द करण्यात आला आहे. या यात्रोत्सवात राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. तसेच खेळणी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते, संसारोपयोगी साहित्य विक्रेत्यांसह मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. या यात्रोत्सवात सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होत असते. परंतु, करोनामुळे यंदाही यात्रोत्सव होणार नाही. परंतु, देवीच्या आपण प्रार्थना करू की, राज्यासह देशातील करोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर. तसेच यात्रोत्सव रद्द झाल्याने भाविकांनी घरीच साध्या पध्दतीने कार्यक्रम करावेत. ज्यांच्या घरी लहान मुलांचे जावळ त्यांनी घरीच आरती लावून जावळ काढावेत व नंतर देवीच्या चरणी अर्पण करावे, असे आवाहनही मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केले.
हेही वाचा - खासदार भामरे यांच्या प्रयत्नातून धुळ्यात 500 रेमडीसीवर उपलब्ध