धुळे - शिपायाकडे ८ हजार रुपये लाचेची मागणी करणारा रुग्णवाहिका चालकास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय दाखला मिळवून देण्यासाठी मध्य प्रदेश येथील माध्यमिक शाळेतील शिपायाकडे ही मागणी केली होती. या कारवाईने रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिरे वैद्यकीय रुग्णालयात लाचखोरांचा सुळसुळाट वाढल्याची चर्चा आहे.
हेही वाचा- पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प महत्वाचा - प्रकाश आंबेडकर
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष आहे. याठिकाणी मध्य प्रदेश येथील पानसेमल गावातील माध्यमिक शाळेत शिपायाला वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याने त्यांनी रुग्णालय गाठले. नवीन रुग्णालय माहीत नसल्याने विचारणा केली. याठिकाणी उपस्थित खासगी रुग्णवाहिका चालकाने संबंधीतकडे वैद्यकीय दाखला मिळवून देण्याकामी ८ हजार रुपये लाचेची मागणी केली. संबंधितास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने याप्रकरणाची शहानिशा करत सत्यता पडताळणी केली. बुधवारी सायंकाळी पथकाने शवविच्छेदन कक्षबाहेर सापळा लावला. याठिकाणी प्रवीण नामदेव विसपुते (सोनार) यास तडजोडीअंती ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरिक्षक प्रकाश झोडगे यांच्या नेतृत्वात जयंत साळवे, प्रकाश सोनार, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, शरद काटके, संतोष हिरे, संदीप सरग, प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर, संदीप कदम, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.
वैद्यकीय दाखल्यासाठी होणारी पिळवणूक कधी थांबणार
दिव्यांगांसाह ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थी, तरुणांना नोकरीसाठी वैद्यकीय दाखला जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने दिला जातो. मात्र, काही दिवसांपूर्वी दिव्यांगासाठी दिला जाणाऱ्या वैद्यकीय दाखला कामात मोठा गैरव्यवहार समोर आला होता. यामुळे सदर लाचखोर चालकाचा कर्ता करविता धनी कोण ? याबाबत विविध चर्चांणा उधाण आले आहे. चौकशीअंती पडद्यामागील मुख्य सुत्रधारस गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. यात रुग्णालय प्रशासनातील काही मोठे मासे अडकण्याची शक्यता असल्याने याचा निःपक्षपाती चौकशी होणे गरजेचे आहे.