धुळे - भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांची एका कार्यक्रमात भेट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही फक्त सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या भेटीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
लोकसभा निवडणूक आणि त्याआधी धुळे महापालिका निवडणुकीत अनिल गोटे हे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सगळ्या राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची सगळ्या राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अनिल गोटे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. आता विधानसभा निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार देणार आहे. अनिल गोटे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीच्या फोटोमुळे ही भेट झाली, त्यात काय चर्चा झाली असेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नसतील ना ? अशा चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. मात्र ही फक्त सदिच्छा भेट असून अनिल गोटे आणि प्रकाश आंबेडकर यांची जुनी मैत्री आहे. मात्र अनेक वर्षांनंतर ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.