धुळे- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर येथे आज भाजपचे उमेदवार काशीराम पावरा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. सभेची तयारी पूर्ण झाली असून थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर काय टीका करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रापासून मुख्यमंत्र्यांनी आपल्या सभांना सुरुवात केली आहे. धुळे जिल्ह्यातील नेर, साक्री आणि शिरपूर येथील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या आज सभा होणार आहेत. विशेषतः शिरपूर येथे होणाऱ्या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून शिरपूर येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर काय टीका करतात आणि भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कोणता अजेंडा मतदारांसमोर ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
हेही वाचा- धुळे : आघाडी विरुद्ध महायुती होणार लढत... कोण होणार विजयी?
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सभा या फक्त भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार देण्यात आला असून देखील याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेचे अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचे वावडे आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी.
हेही वाचा- भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे मीडियावर निर्बंध, अनिल गोटेंची सणसणीत टीका