चंद्रपूर -चिमूर तालुक्यातील कवठाळा येथील एका युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. हा तरुण स्वतः घराच्या छतावर चढून काम करत असताना त्याला विजेचा धक्का बसला. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विशाल निलकंठ बोबळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे .
पावसाळा सुरु झाल्याने छतावरुन घरात पाणी येऊ नये याकरता ग्रामीण भागात घरांची दुरूस्ती व छतावर ताडपत्री टाकण्याची कामे सुरु आहेत. याच कारणामुळे कवठाळा येथील तरूण विशाल निलकंठ बोबळे (वय २९) हा पत्र्याचे छत असलेल्या घरावर चढून दुरूस्तीचे काम करीत होता. यावेळी अचानक विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने विशालचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांना विशाल जिवंत असल्याचे वाटल्याने त्यांनी तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले . तरूणाच्या अचानक जाण्याने कुटुंबावर आभाळ कोसळले असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.