चंद्रपूर - यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्या कार्यकर्त्याने धारीवाल कंपनीच्या अधिकाऱ्याला कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार तहसील कार्यालयात तहसीलदार माने यांच्यासमोरच घडला. चंद्रपूर शहरालगत धारीवाल ही कंपनी आहे. यामध्ये वीज निर्मिती केली जाते. मात्र येथे स्थानिक कामगारांना प्राधान्य न देता परप्रांतियांना काम दिले जात होते. याविरोधात यंग चंदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात कंपनीवर मोठा मोर्चा काढण्यात आला होता.
स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याची मागणी यावेळी जोरगेवार यांनी रेटून धरली होती. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावर तोडगा काढण्यासाठी जोरगेवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला पंधरा दिवसांची मुदत दिली होती. मात्र यानंतरही कंपनी प्रशासनाने यावर कुठलीही महत्त्वाची कारवाई केली नाही. शुक्रवारी तहसीलदार माने यांच्या कार्यालयात धारीवाल कंपनीचे व्यवस्थापन आणि प्रकल्पग्रस्त तसेच किशोर जोरगेवार यांच्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते, या चर्चेदरम्यान जोरगेवारचे एक कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्याने थेट कंपनीचे एचआर संतोष काकडे यांच्या कानशिलात लगावली.
विशेष म्हणजे हा प्रकार तहसीलदार माने यांच्यासमोर घडला, तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. असे असतानाही हा प्रकार घडला. यावेळी जोरगेवार यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ कळला. या प्रकरणात अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.