चंद्रपूर - ग्रामीण भागात विक्री व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानकडून जिल्ह्यात 'रुरल हाट' नावाचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जात असून, राजूरा तालुक्यातील विहीरगाव व हरदोना खुर्द येथे रुरल हाट सुरू करण्यात आले. अगदी पहिल्याच दिवशी ग्राहकांनी विविध वस्तूंची खरेदी करून स्वयंसहायता समुहांचा उत्साह वाढविला.
हेही वाचा - चंद्रपूर : नाफेडतर्फे तूर खरेदी सुरू; प्रति क्विंटल सहा हजार भाव
बचतगटातील महिला विविध वस्तूंचे उत्पादन करतात. मात्र, त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळत नाही. ही अडचण लक्षात घेवून उमेद अभियानातील बचतगटांच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीची रितसर परवानगी मिळवून गावातच दैनिक किंवा आठवडी छोटेखानी बाजार सुरू करण्याच्या संकल्पनेने अनेकांना सुविधाजनक झाले आहे. विशेषकरून स्थानिक भाजीपाला उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.
काल (2 फेब्रुवारी) रोजी चुनाळा-विरूर प्रभागातील विहीरगाव येथील मा जिजाऊ महिला ग्रामसंघाद्वारे रुरल हाटचे आयोजन करून विधीवत उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास राजूरा पंचायत समितीचे सभापती मुमताज जावेद, उपसभापती मंगेश गुरनुले, पंचायत समिती सदस्य माणूसमारे, माजी सभापती जेनेकर, सचिव सूर्यवंशी, जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, तालुका अभियान व्यवस्थापक डोंगरे, तालुका व्यवस्थापक पडवे, भडके, प्रभाग-समन्वयक अमित भगत, ग्रामसंघ पदाधिकारी व समुहातील सदस्य उपस्थित होते. उद्घाटन सभापती यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रुरल हाटमध्ये प्रथम दिवशी 10 समुहातील सदस्यांनी आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
दिनांक 29 जानेवारी रोजी आर्वी-पाचगाव प्रभागातील हरदोना खुर्द येथील सुरक्षा महिला ग्रामसंघाद्वारे रुरल हाटचे आयोजन करून उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांसह सरपंच, सचिव मेश्राम, प्रभाग समन्वयक साईकिरण धोटे, सर्व ग्रामसंघ पदाधिकारी व समुहातील सदस्य उपस्थित होते. सदर बाजार हाटचे उद्घाटन उपसभापती गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले. बाजार हाटमध्ये प्रथम दिवशी 12 समुहातील सदस्यांनी आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. या संकल्पनेचा इतर तालुक्यांनीही अनुसरण करावे व उत्पादने विक्री करावी, असे आवाहन मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डीले, अभियान सहसंचालक किरवे, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने यांनी केले.
हेही वाचा - आमचे गाव आमचे सरकार : गावाच्या राजकरणात नव्या पिढीचा उदय