चंद्रपूर- पंचवीस वर्षापूर्वी नागपूर येथे मंत्रालयावर गोवारी बांधवांनी मोर्चा काढला होता. या मोर्च्यावर पोलिसांचा लाठीमार झाला होता. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. मोर्चात जिल्ह्यातील शेकडो गोवारी बांधव सहभागी झाले होते. त्यातील काहींचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडातील प्रत्यक्ष दर्शींनी आठवणीला उजाळा दिला आहे.
जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील सहा महिला गोवारी हत्याकांडात शहीद झाल्या होत्या. तर अमानुषपणे होणारा लाठीमार, रक्तबंबाळ झालेली माणसे बघून स्वताचा जीव वाचविण्यासाठी जो तो सैराभैर धावत होता. नागपुरातील हत्यांकांडात अनेक कुटुंबे उध्वस्त झाली होती. या अमानुष घटनेचे दोन साक्षिदार गोंडपिपरी तालुक्यात आहेत. हत्याकांडाचा आठवणीने आजही त्यांच्या थरकाप उडतो.
चंद्रपूर जिल्ह्यातील पारगाव येथील भास्कर बोंडकू नेवारे हे शिक्षणासाठी नागपूरला होते. २३ नोव्हेंबर १९९४ ला गोवारी बांधवांचा मोर्चा मंत्रालयावर धडकला. या मोर्च्यात ५० हजार गोवारी बांधव सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यातूनही शेकडो गोवारी बांधव मोर्चासाठी नागपुरात दाखल झाले होते. भास्कर नेवारे हे ही मोर्च्यात होते. सायंकाळचा सुमारास अचानक मोर्च्यावर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. जीव वाचविण्यासाठी जो तो सैरावैरा धावत होता. चेंगराचेंगरी झाली, ११४ गोवारी बांधवांना जीव गमवावा लागला.
चेंगराचेंगरी दरम्यान भास्कर नेवारे यांनी आपल्या मित्रासोबत सुरक्षित स्थळ गाठले. भीतीने त्यांचे शरीर थरथरत होते. दुसऱ्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सहा बांधव शहीद झाल्याची माहिती त्यांना मिळाली. कुणी ओळखीचा मिळेल या आशेने भास्कर नेवारे यांनी नागपूर येथील सरकारी रुग्णालय गाठले. रात्री आठ वाजेपर्यंत ते रुग्णालयात विचारपूस करित होते. त्या काळ्या दिवसाची आठवण मनात खोल रुतून बसली आहे. त्या आठवणींनी आजही अंगावर काटे उभे होतात. आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आवाज उठविण्याची ऐवढी भयंकर सजा कुणालाच मिळाली नसावी, अशी खंत भास्कर यांनी व्यक्त केली.
गोंडपिपरी तालुक्यातील उंदीरगाव येथील काशिनाथ लक्ष्मण ठाकूर हे गोवारी हत्याकांडाचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. आज त्यांनी वयाची अंशी गाठली. मात्र, हत्याकांडातील कटू आठवणी ते विसरले नाहीत. खेड्यागावातील काशिनाथ यांना नागपूर शहर नवे होते. सोबत्यांचे हात धरून त्यांनी नागपूर गाठले. मोर्चा बिथरला तेव्हा काशिनाथ ठाकूर हे खूप धास्तावले होते. कुठे जायचे कुठे लपायचे काही कळेना. मिळेल त्या वाटेने ते धावत गेले. कसेबसे बसस्थानक गाठले आणि घरी परतले. आपल्या आयुष्यातील तो काळाकुट्ट दिवस ठरला. त्या आठवणी नकोश्या झाल्या आहेत, असे थरथरणाऱ्या ओठांनी काशिनाथ ठाकूर यांनी आपली आपबिती सांगितली.
राजूरा तालूक्यावर शोककळा
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातून मोर्च्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने गोवारी बांधवानी नागपूर गाठले होते. यात महिलाही होत्या. पोलिसांचा लाठीमार आणि चेंगराचेंगरीमुळे तालुक्यातील ६ महिला शहीद झाल्या होत्या. राजूरा तालुक्यातील चिंचोली येथील दोन महिला, टेंभुर्वाही येथील दोन, अंतरगाव आणि सुबई येथील दोन महिला शहीद झाल्या होत्या. शहिदांचे कुटुंब दरवर्षी नागपूर गाठतात. शहिदांच्या आठवणीने त्यांचे डोळे आपसुकच पाणावत असतात.
हेही वाचा- चंद्रपूर महानगरपालिका; महापौरपदी राखी कंचर्लावार तर उपमहापौरपदी राहुल पावडे