चंद्रपूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच सर्व पक्षात कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातुन नुकतेच काँग्रेसने विशाल मुत्तेमवार यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी नाव घोषित झाल्यानंतर मंगळवारी रात्री विशाल मुत्तेमवार यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते व तरुणवर्गामध्ये उत्साहा दिसून आला.
विशाल मुत्तेमवार यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले, की मला खूप आनंद होत आहे. माझ्या सारख्या काँगेसच्या तरुण कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली. देशातील तरुणांना एकत्र करण्याचे काम काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी हे तरुण वर्गाचे नेते आहेत. यामुळे तरुणाई समोर यावी, अशी त्यांची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष तरुण व महिलांना राजकारणात संधी देत आहे. मला काँग्रेस पक्षाने दिलेली संधी मी नक्कीच पूर्ण करेल. चंद्रपूरकरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. चंद्रपूरकरांचा विकास हाच ध्यास, असेही शेवटी ते म्हणाले.