चंद्रपूर- जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील जोगापूर परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. दहशतीच्या सावटातच जोगापूरच्या प्रसिद्ध यात्रेला सुरूवात झालेली आहे. अश्यात जोगापूर परिसरात वाघ आढळून आल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ जोगापूर परिसरातील नाही, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
राजुरा तालुक्यातील जोगापूर यात्रा सर्वत्र प्रसिद्ध आहे. या यात्रेला सुरूवात झालेली आहे. मात्र, त्यावर वाघाच्या दहशतीचे सावट पसरले आहे. जोगापूर वनक्षेत्रात वाघाच्या हल्यात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. अश्या अप्रिय घटनांना टाळण्यासाठी वनविभागाने खाजगी वाहनांना बंदी घातली. विभागाकडून सूचनांचे फलक लावण्यात आले. अश्यात जोगापूर परिसरात वाघ आढळून आल्याचा फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ आणि फोटोमुळे भाविकात दहशत वाढली आहे. दरम्यान, सदर प्रकरणाबाबत राजुरा वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी विदेशकुमार गलगट यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधला असता, व्हायरल झालेला व्हिडिओ हा जोगापूर वनपरिक्षेत्रातील नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, सदर व्हिडिओ कुठल्या क्षेत्रातील आहे, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- चंद्रपूरमध्ये गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न; गावकऱ्यांनी उधळून लावले मनसुबे