चंद्रपूर - ब्रम्हपुरी तालुक्यात एका आठवड्यात दोन जणांचा बिबट्याने बळी घेतला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले. येत्या 48 तासांच्या आत बिबट्याला पकडा, नाहीतर बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश सरकारकडून दिले जातील, असे असा अल्टिमेटम वडेट्टीवार यांनी वन विभागाला दिला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची वडेट्टीवार यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज चिचगाव येथे जाऊन मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचे धनादेश दिले. चिचगाव येथे गेल्या एका आठवड्यात दोन महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यापैकी पहिली घटना 3 डिसेंबर रोजी घडली. या घटनेत ताराबाई ठाकरे (55) या महिलेचा मृत्यू झाला. सकाळी गावाबाहेर शेण टाकायला गेलेल्या ताराबाईंवर बिबट्याने हल्ला केला होता.
बिबट्याच्या हल्ल्यात दोघींचा मृत्यू -
बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना 7 डिसेंबर (सोमवारी) रोजी घडली. या घटनेत सायत्रा ठेंगरी (60) या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला सरपण गोळा करायला संध्याकाळी घरामागे गेली होती. त्यावेळी बिबट्याने या महिलेवर हल्ला केला. त्यात महिलेला प्राण गमवावे लागले. बिबट्याच्या हल्ल्यांमुळे गावकरी चिंतेत आहेत. घराबाहेर पडावे की पडून नये, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. परंतु शेतीच्या कामांसाठी, उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडणे गरजेचे आहे. अशात जीव मुठीत धरुन गावकरी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आज चिचगाव येथे जाऊन ठाकरे आणि ठेंगरी या दोन्ही मृत महिल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. दरम्यान वडेट्टीवार यांनी गावकरी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, तसेच गावकऱ्यांना आश्वस्त केले.
हेही वाचा - ईडी'ला राज्य सरकार रोखू शकते का? जाणून घ्या काय म्हणतोय कायदा