चंद्रपूर - राज्य शासन जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू असतानाच ओबीसी खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावर सूचक वक्तव्य केले आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्पाला भेट देणारे विदेशी पर्यटक इथे राहण्यासाठी उत्सुक नसतात कारण इथे बंदी असल्याने त्यांना मद्य मिळत नाही. म्हणून ते नागपुरात थांबतात, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच वडेट्टीवार चंद्रपुरात आले, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा - चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठण्याच्या शक्यतेवर डॉ. अभय बंग यांची संतप्त प्रतिक्रिया
जर विदेशी पर्यटकांची अशी गैरसोय होत असेल तर, त्याला टाळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकार महसुलाची तूट भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने कामगारांची संख्या अधिक आहे. मेहनत करणाऱ्या कामगारांमध्ये मद्याची मागणी आहे. त्यामुळे दारूबंदीची समीक्षा होणे गरजेचे आहे. त्यासाठी एक समिती गठीत करणार असल्याचेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.