चंद्रपूर - आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. दरम्यान, आज याविरोधात चिमूर येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या संस्थेतील आदिवासी वसतिगृहात चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले. या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये मुलींचे पालक आर्थिक मदतीच्या आमिषाने तक्रारी करीत आहेत, असे वादग्रस्त आणि लज्जास्पद वक्तव्य करण्यात आले होते. यावेळी सुभाष धोटे यांच्यासोबत विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बाळू धानोरकर उपस्थित होते.
या वक्तव्याचे तीव्र पडसाद समाजमनात उमटले. अनेक ठिकाणी मोर्चे काढून याचा निषेध नोंदविण्यात आला. या वक्तव्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांना महिला आयोगाने नोटीस बजावली. तर सुभाष धोटे यांना जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला.
दरम्यान, आज चिमूर येथे वंचित बहुजन आघाडी, आदिवासी-माना जमात, विद्यार्थी युवा संघटनेच्यावतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या नेत्यांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यामध्ये अरविंद सांदेकर, सुहानंद ढोक, निळकंठ शेंडे, नितीन रामटेके, कुलदीप श्रीरामे यांचा सहभाग होता.