राजूरा - वाकाटक वंशातील शेवटचा राजा व्दितीय पृथ्वीसेण यांची राजमुद्रा गोजोली येथील उराडे परिवाराकडे सापडली. ही ऐतिहासिक वस्तू सर्वांना बघता यावी यासाठी उराडे परिवाराने नागपूर मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाकडे ही राजमुद्रा सुपूर्द केली आहे. लवकरच ही राजमुद्रा नागपूर मध्यवर्ती संग्रालयात प्रेशकांसाठी ठेवली जाणार आहे.
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या गोजोली येथील प्रकाश उराडे यांनी राजमुद्रेचे जतन करून ठेवले होते. प्रकाश उराडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रणजित उराडे याने वडिलांची संदूक खोलली असता, त्यात त्यांना ही राजमुद्रा आढळून आली.
अशी आहे राजमुद्रा
या राजमुद्रेवर बोधीसत्व तारा यांचे चित्र अंकित असून ब्राम्ही लिपीतील चार ओळीचा लेख कोरलेला आहे. राजमुद्रेचे वजन ६० ग्राम असून ७ से.मी.लांब ३ से.मी रुंदी आहे. रंजित उराडे याने ही राजमुद्रा इतिहास अभ्यासक निलेश झाडे यांना दाखविली. झाडे यांनी राजमुद्रेचा खरा इतिहास बाहेर आणला.
राजमुद्रा सापडल्याचे वृत्त माध्यमातून प्रकाशित झाले. त्यांनंतर नागपूरच्या संग्रहालयाचे सहाय्यक संचालक जया वाहने यांनी भ्रमणध्वनीव्दारे उराडे परिवारांशी संपर्क साधला, व त्यांना राजमुद्रेसंदर्भात पत्रही पाठवले. इतिहासाचा दृष्टीने ही राजमुद्रा फार अनमोल असल्याचे समजावून सांगितले. जया वाहने यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उराडे परिवार संग्रहालयाला संग्रहालयास राजमुद्रा देण्यासाठी तयार झाले. त्यानंतर संग्रहालयाची चम्मू शुक्रवारी गावात आली. उराडे परिवाराने हा अनमोल ठेवा त्याच्या हवाली केला.
आता राजमुद्रा नागपूरच्या संग्रहालयात ठेवली जाणार आहे. यावेळी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक विनायक निटूरकर, ऐतिहासिक वारसा संवर्धन समितिचे अरूण झगडकर, इतिहास अभ्यासक निलेश झाडे, पत्रकार संदिप रायपुरे, समीर निमगडे, सुरज माडूरवार, दिपक वांढरे आदिंचि उपस्थिती होती.