चिमूर (चंद्रपूर)- देशाला स्वांतत्र्य मिळूनसुद्धा प्रशासनाचे इंग्रज प्रेम काही कमी झाल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाने शहरातील अभ्यंकर मैदानातील इंग्रजकालीन पडक्या वास्तूमध्ये खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लसीकरण उपकेंद्र चालविले आहे. त्यामुळे, या वास्तूमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचारी, लसीकरणासाठी येणाऱ्या महिला यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत अनेक वास्तू बांधल्या. काही वास्तू जमीनदोस्त झाल्या, तर काही अजूनही इंग्रजी राजवटीचा इतिहास घेऊन उभ्या आहेत. चिमूर शहरात आजही इंग्रज कालीन पोलीस ठाणे, रेस्ट हाऊस, आरोग्य अधिकाऱ्यांचे निवास असलेल्या इमारती, तथा चिमूर वरोरा मार्गावरील लोखंडी पूल अस्तित्वात आहे. चिमूर-वरोरा मार्गावर ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत झाल्यानंतर अंभ्यंकर मैदान येथे इंग्रजकालीन असलेली प्राथमीक आरोग्य केंद्राची इमारत जमीनदोस्त करण्यात आली व या मैदानाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र, याच अभ्यंकर मैदानात इंग्रजांनी आरोग्य अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
ही लसीकरण केंद्राची वास्तू इंग्रजांनी बांधलेली आहे. वास्तू मोडकळीस आली असून तिच्या भीतींना तडे पडले आहेत. छताला पावसाळ्यात गळती लागते. कवेलू विस्कटलेले आहेत. वास्तूमध्ये मिटर आहे, मात्र विज जोडणी नाही. अशा परिस्थितीमध्येही या वास्तूमध्ये गरोदर महिला, स्तनदा माता व बालकांचे लसीकरण होते. लसीकरण केंद्र इतरत्र न हलवल्यास केंद्रातील कार्यरत आरोग्य कर्मचारी व लसीकरणासाठी आलेल्या महिला यांची जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांकडून केंद्र इतरत्र हलविण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा- गणेशोत्सव; कृत्रिम तलावांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद; पाच दिवसात ३,१४३ गणेशमूर्तींचे विसर्जन