चंद्रपूर - वन्यजीवांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एका तरुण जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घुग्गूस येथील शेतशिवारात सकाळच्या सुमारास उघडकीस आली. स्वामीदास तक्कला (30) आणि त्याची पत्नी उमेश्वरी तक्कला (28) अशी मृतकांची नावे आहेत.
मृतकांच्या वारसांना मोबदला देण्याची मागणी -
मृतक पती आणि पत्नी हे घुग्गूस येथील शांतीनगर येथे राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. शनिवारी रात्री ते घराबाहेर पडले. यावेळी सोनबा लक्ष्मण बांदुरकर यांच्या शेतात वन्यजीवांपासून पीक आणि पालेभाज्यांचे रक्षण करण्यासाठी जिवंत विद्युत तारांचा प्रवाह सोडण्यात आला होता. या शेतातून जाताना त्यांना अचानक विद्युत तारांचा स्पर्श झाला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे पथकासह घटनास्थळी पोचले. यावेळी हे पती-पत्नी अवघ्या काही अंतरावर मृतावस्थेत आढळून आले. जोपर्यंत मृतकांच्या वारसांना मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला. त्यामुळे काही काळ येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यासाठी दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले. यावेळी मृतकांच्या नातेवाईकांनी 50 लाख रुपयांच्या मोबदल्याची मागणी केली. मात्र, पोलीस स्टेशन येथे झालेल्या वाटाघाटींमध्ये नऊ लाख रुपये भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले.
जिवंत विद्युत प्रवाह आणखी किती बळी घेणार -
वन्यजीवांपासून आपल्या पिकाची रक्षा करण्यासाठी शेतकरी आपल्या शेताला विद्युत तारेचे कुंपण घालतात. यामध्ये अनेकदा वाघ-बिबट तसेच इतर प्राण्यांच्या मृत्यू होतो. अनेकदा अशा घटना उजेडात येत नाहीत. मात्र, हा प्रकार वन्यजीवन सोबत मानवालादेखील अत्यंत धोकादायक आणि जीवघेणा आहे, हे आज घडलेल्या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे शासनाने यावर गंभीर विचार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी पर्याप्त सुविधा उपलब्ध करून देणे आणि अशा विद्युत तारांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
हेही वाचा - काँग्रेस-डाव्यांमध्ये कोणताही गैरसमज नाही; बंगाल विधानसभा निवडणूक एकत्रच लढवणार