चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका तलावाजवळ तब्बल तीन वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
10 जूनला एक वाघीण मृतावस्थेत आढळली होती. आज (रविवारी) आणखी दोन वाघ याच परिसरात आढळले. या सर्वांचा मृत्यू विषप्रयोगाने झाल्याची दाट शक्यता आहे. तीन दिवसांपूर्वी म्हणजे 10 जूनला ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मोहूरली बफर झोनमधील सितारामपेठ या बिटात एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली आहे. घटनास्थळापासून तलाव अवघ्या काही अंतरावर आहे. रविवारी दुपारी याच घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर दोन बछडे मृतावस्थेत आढळले. सोबत दोन वानरे देखील घटनास्थळी मृतावस्थेत आढळली. हे बछडे याच वाघिणीचे असल्याची दाट शक्यता आहे. सर्व कुजलेल्या अवस्थेत आढळले आहेत.
याची माहिती मिळताच ताडोबाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास सुरू आहे. तलावापासून कोंडेगाव हे गाव अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. या सर्व येथे विषप्रयोग होण्याची दाट शक्यता आहे. यासाठीचा कसून तपास ताडोबातील पथक करीत आहे. मागील चार दिवसांत तीन वाघ आणि एक बिबट्याचा मृत्यू जिल्ह्यात झाला आहे.
विशेष म्हणजे बिबट्याचा मृत्यू हा रानडुकरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळात अडकून झाला होता. तर हे तीन वाघ देखील विषप्रयोग झाल्याने मृत पावले असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा विषप्रयोग नेमका कुठल्या कारणासाठी करण्यात आला. यामागे देखील शिकार हे कारण आहे का? याचा तपास होणे अत्यावश्यक झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.