चिमूर (चंद्रपूर) - ताडोबा व्याघ्रप्रकल्प व रामदेगी बफर झोन निर्मितीच्या अनेक वर्ष पूर्वीपासून हिंदू आणि बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या संघरामगिरी- रामदेगी येथे हिंदू व बौद्ध धर्माच्या नागरिकांना धार्मिक कार्यासाठी जाण्यासाठी वन विभागाने बफर झोनच्या नावाखाली बंदी केली आहे. त्यामुळे संघरामगिरी-रामदेगीच्या मुक्तीसाठी हजारोच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले.
साडेतीन किलोमिटर पायदळ मार्च
संघारामगिरी रामदेगी मुक्तीसाठी जिल्ह्यातील तथा जिल्ह्या बाहेरील हिंदू आणि बौद्ध समाजाचे अनुयायी भदंत महाथेरो ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वाखाली अबालवृद्ध, महिला, युवक रस्त्यावर उतरून वनविभागाच्या विरुद्ध गुजगव्हान ते संघरामगिरी साडेतीन किलो मीटर पायदळ मार्चमध्ये सहभागी झाले.
वनविभागाचे गुरुप्रसाद विरोधात रोष
पुरातन काळापासून रामदेगी व संघरामगिरी येथे हिंदू व बौद्ध बंधावचे धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे याठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, वन विभागाच्या गुरुप्रसाद या अधिकाऱ्याच्या दडपशाहीमुळे या परिसरात नागरिकांना त्याचे धार्मिक विधी करण्यासाठी बंदी घालण्यात आली. 30 व 31 जानेवारीला झालेल्या धम्म समारंभास जिल्हाधिकारी यांची परवानगी असतानाही मंडप डेकोरेशनचे वाहन जप्त करून कारवाई करण्यात आली होती. तर रामदेगी देवस्थानचे सचिव हनुमंत कारेकर यांनी वरोरा न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात न्यायालयाने सुद्धा नागरिकांना परवानगी दिली. मात्र, वनविभागाने न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान करीत नागरिकांना रामदेगी येथे जाण्यासाठी परवानगी नाकारली. यामुळे आंदोलकांनी या अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला.
आंदोलनात यांचीही उपस्थिती
वन विभागा विरोधातील आंदोलनात पीरिपाचे राष्ट्रिय अध्यक्ष प्रा.जोंगेद्र कवाडे, कमलताई गवई , माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, वंचितचे राज्य महासचिव राजु झोडे, राष्ट्रवादीच्या वर्षा शामकुडे, चिमूर विधानसभा काँग्रेस समन्वयक तथा जिल्हा परीषद सदस्य डॉ. सतिश वारजुरकर, बिरसा ब्रिगेडचे सतिश पेंदाम, वंचितचे अरविंद सांदेकर, हनुमंत कारेकार , शेर खान पठाण, गोंविदा महाराज व भिख्कु संघ
खुले करदो रास्ते भंतेजी के वास्ते :
सुलेखा कुंभारे , वर्षा शामकुळे यांचे 'खुले कर दो रास्ते भन्तेजी के वास्ते' या नार्याने तथा दडपशाही करणाऱ्या वनाधिकारी गुरुप्रसाद यांना आंदोलन स्थळी अणावे अन्यथा आम्ही हटणार नाही तथा नेहमी करीता रामदेगी गेट खुले करावे या आंदोलकाच्या मागणीने तणाव वाढला होता मात्र सहाय्यक पोलीस अधिक्षक नितिन बगाटे यांचे मध्यस्थीने तणाव निवळला.