चंद्रपूर - आजवर पैसे, सोने, चांदीच्या दागिन्यांसाठी घरफोड्या झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वरोरा तालुक्यातील येन्सा येथे मात्र, चोरट्यांनी चक्क गोदाम फोडून गॅस सिलिंडर पळवल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी 102 सिलिंडर लंपास करण्यात केले आहेत. एचपी गॅस एजन्सीचे मालक प्रतीक डोर्लीकर यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे.
5 सप्टेंबरला सकाळी ३०६ सिलिंडर भरलेला ट्रक येन्सा येथील गोदामात आला. अगोदरचे १९ सिलिंडर मिळून एकूण ३२५ सिलिंडर या गोदामात होते. त्यापैकी ५८ गॅस सिलिंडरची विक्री करण्यात आली. सायंकाळी चौकीदार दिलीप चावरे यांनी मालक डोर्लीकर यांच्या भ्रमणध्वनीवर २६७ सिलिंडर शिल्लक असल्याचा संदेश पाठवला. त्यानंतर गोदामाला टाळे लावून चौकीदार घरी गेला. रात्री गोदामात चौकीदार नसतो. याचा फायदा चोरट्यांनी उचलला व १०२ सिलिंडर लंपास केले.
6 सप्टेंबरला सकाळी गोदाम उघडल्यानंतर सुरक्षा भितींचे दार व गोदामाचे मागचे दार तोडून १०२ घरगुती वापराचे भरलेले गॅस सिलिंडर चोरुन नेल्याचे समोर आले. त्यांची किंमत २ लाख ३८ हजार २५० रुपये इतकी आहे. गोदाम मालक प्रतीक डोर्लीकर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या चोरीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही चोरी सुनियोजितपणे करण्यात आली आहे. यासाठी मोठ्या वाहनांची देखील मदत घेण्यात आली असल्याची शंका आहे. त्यामुळे चोरटे परिसरातीलच आहेत का? याचा तपास पोलीस करत आहे.