चंद्रपूर - कोरोना संशयित रुग्ण म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह आली असून सर्व चंद्रपूरकरांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे. सदर दाम्पत्य हे 28 फेब्रुवारीला दुबईहून चंद्रपुरात दाखल झाले होते. यामुळे जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - वादळी वाऱ्यासह पाऊस आला अन् गहू, ज्वारीसाठी केलेला खर्च क्षणार्धात मातीत गेला'
28 फेब्रुवारीला दुबईहून नागपूर विमानतळाहुन चंद्रपुरात दाखल झाल्यानतंर तेव्हा पासून त्यांना सर्दी, डोकेदुखीचा त्रास होता. यासाठी ते उपचार घेत होते. मात्र, तरीही ते बरे न झाल्याने शुक्रवारी हे दाम्पत्य स्वतः जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. विशेष म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत देशात हायअलर्ट नसल्याने ह्या दाम्पत्याची कुठलीही नोंद जिल्हा प्रशासनाकडे नव्हती. दुबईहून आल्यानंतर जवळपास शंभर लोकांशी या दाम्पत्याचा संपर्क आला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली होती. दरम्यान, या जोडप्याचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ज्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.
दरम्यान, शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व शासकीय कार्यालयामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. यासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील विश्रामगृह 4 मार्च पासून विलगीकरण कक्ष म्हणून घोषित करण्यात आले असून हे विश्रामगृह आरक्षित करण्यात आले असल्यास ते रद्द करण्यात यावे आणि इतर कोणालाही पुढील आदेश होईपर्यंत देण्यात येऊ नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.