चिमूर (चंद्रपूर)- देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्याकरीता लॉकडाऊन जाहीर करून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, याकरीता विविध स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी राष्ट्रीय कुंटूब अर्थसहाय्य योजनेचा धनादेश काजळसर येथील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन दिले. तहसीलदारांच्या या कृतीमुळे लाभार्थी महिला भारावून गेल्या.
लॉकडाऊनमूळे गरीब, मजूर, शेतकरी, शेतमजुर हवालदील झाला आहे.अनेकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शासकीय ,स्वंयसेवी तथा दानशुर व्यक्ती कडून विविध स्वरूपाची मदत करण्यात येत आहे. गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा असा शासनाचे आदेश आहेत. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेद्वारा दारिद्र्य रेषे खालील कुटुंबातील कमावत्या सदस्स्याचा दुर्दैवाने मृत्यु झाल्यास कुटुंबातील सदस्यास वीस हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत चिमूर तालुक्यातील सतरा प्रकरणे मंजूर झाली होती. त्याप्रमाणे सर्व लाभार्थ्यांचे मिळून तीन लाख चाळीस हजार रुपयांचे धनादेश वाटपासाठी तयार करण्यात आले होते.
लॉकडाऊनमध्ये सध्या सार्वजनिक वाहतूकही शासनाने बंद असल्याने कार्यालय कसे गाठावे हा प्रश्न लाभार्थ्यापुढे होता.सध्याच्या काळात रोजगार, मजुरी बंद असल्याने हलाकीच्या परिस्थितीमध्ये सर्व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन धनादेश देऊन त्यांना मदत करावी असे चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी ठरविले.याची सुरुवात तहसीलदारांनी काजळसर येथील लाभार्थी शशिकला हरीदास नन्नावरे व सीमा अशोक रामटेके रा. मजरा (बे) यांच्यापासून केली. प्रत्यक्ष तहसीलदारच धनादेश घेऊन आल्याचे पाहून लाभार्थी महिलांना आनंदाश्रू अनावर झाले. विविध शासकीय योजनेच्या लाभाकरीता कार्यालयाच्या पायऱ्या झिजवूनही मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागते,असे सर्वसाधारण चित्र दिसते. घरी येऊन मदतीचा धनादेश दिल्याने त्यांनी लाभार्थी महिलांनी तहसीलदारांचे आभार मानले. तहसीलदारांनी आर्थिक अडचणींवर मात करण्याबाबात मार्गदर्शन करून कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली. प्रशासकीय अधिकाऱ्याच्या या आपुलकीने त्या महिला भारावल्या होत्या. याप्रसंगी भीसीचे अप्पर तहसीलदार परीक्षित पाटील, काजलसरचे व मजरा (बे)चे तलाठी हजर होते.