चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने सुरू केलेल्या ऑनलाइन सफारीला जगभरातून भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, याच्या निवेदनात वाघांची तांत्रिक नावे, त्याचे नेमके ठिकाण याचा खुलासा केला जात होता. यावर वन्यजीवप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदविला. ही बातमी 'ईटीव्ही भारत'ने लावून धरली. बातमी लागताच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने तातडीने आपली चूक सुधारली असून आता ऑनलाइन सफारीच्या व्हिडिओत वाघांचे तांत्रिक नावे आणि त्याच्या ठिकाणांचा उल्लेख वगळला आहे.
लॉकडाऊनमध्ये ताडोबाप्रेमींचा हिरमोड होऊ नये यासाठी व्यवस्थापनाने 17 एप्रिलपासून एक अभिनव उपक्रम सुरू केला. प्रकल्प संचालक एन. आर. प्रवीण यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला असा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. 'tar 4k live' असे युट्यूब चॅनेल उघडण्यात आले. ज्यात आदल्या दिवशी सफारी करतानाचे चित्रांकन संपादित करून दुसऱ्या दिवशी टाकण्यात येते. याला दिवसेंदिवस प्रतिसादही वाढत आहे.
वन्यजीवप्रेमींनी या उपक्रमाचे कौतुकच केले. मात्र, काही आक्षेपार्ह गोष्टींचा त्यात उल्लेख केला जात होता. व्हिडिओ दाखवताना वनाधिकारी आणि निवेदक संपूर्ण तांत्रिक बाबींचा उल्लेख करीत होते. आपण कुठल्या रस्त्यावर आहोत, त्यानंतर कुठल्या बाजूने वळण घेतले, कुठला पाणवठा आहे. तिथे असलेल्या वाघांची ओळख आणि त्याचा तपशील येथे उघड केला जात होता. यावर अनेकांनी आक्षेप घेतला. यापूर्वी ताडोबा व्यवस्थापनाने आत दिसलेल्या वाघांचे ठिकाण फोटोत टाकू नये असे निर्देश दिले. तसेच ताडोबात मोबाईल चित्रीकरणावरही बंदी घालण्यात आली. येथील वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक होते. मात्र, ऑनलाइन सफारीत स्वतः व्यवस्थापनाला याचा विसर पडला.
यावर काही वन्यजीवप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला. यामुळे वाघांचे अधिवास आणि त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच वाघाला सफारीचा केंद्रबिंदू न करता ताडोबात इतर वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकण्यात यावा असे त्यांचे म्हणणे होते. 'ईटीव्ही भारत'ने हा मुद्दा समोर आणला होता. याच्या दुसऱ्या दिवशीपासून ऑनलाइन सफारी व्हिडिओत आक्षेपार्ह अशा गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. या निर्णयाचे वन्यजीप्रेमींनी स्वागत केले आहे.