चंद्रपूर - 'ज्या एकनाथ खडसेंनी भाजपा पक्षाची पाळेमुळे राज्यात रोवली, ज्यांच्या मार्गदर्शनात आजचे अनेक नेते घडले, त्यांनी भाजपा पक्ष सोडावा, हे अत्यंत वेदनादायक आहे. असा खंदा नेता पक्ष सोडतो, तेव्हा पक्षाचे फार मोठे नुकसान होते. अशाच प्रकारे पक्षाला गळती लागली तर, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या घटनेवर पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे,' असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपालाच सल्ला दिला आहे.
जेव्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार दूरदूरपर्यंत दिसत नव्हते, तेव्हा महाजन-मुंडे-गडकरी यांच्या खांद्याला खांदा लावत खडसेंनी भाजपा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला. भाजपाच्या विस्तारात खडसेंचे मोठे योगदान आहे. मात्र आज खडसेंनी पक्ष सोडला, ही बातमी एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी धक्कादायक आहे. एका सच्चा राष्ट्रवादी पक्षातून 'राष्ट्रवादीपणाचा बुरखा' पांघरणाऱ्या पक्षात त्यांची जावे, हे अजूनही न पटण्यासारखे आहे.
हेही वाचा - भाजप सोडणार नाही- रक्षा खडसे, जाणून घ्या या मागे काय असेल कारण...
खडसे यांच्यासोबत गेली 25 वर्षे एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. खडसेंच्या नेतृत्वात विरोधी पक्षात असताना आमची संख्या कमी होती. मात्र, बळ वाघाचे होते. भाजपाचा पाया रोवणारे खडसे पक्षात नाहीत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. अशावेळी पक्षाला खऱ्या अर्थाने आत्मचिंतनाची गरज आहे. भाजपा हा एक परिवार आहे. तो कुठल्या परिवाराचा पक्ष नाही. अशा वेळी खंदे नेते जर पक्ष सोडत असतील तर, पक्षाच्या संघटनाबांधणीसाठी हे धोकादायक आहे. जर पक्ष मजबूत करायचा असेल तर, यावर गंभीर पद्धतीने चिंतन व्हायला हवे, असे म्हणत मुनगंटीवार यांनी आपल्याच पक्षाला सल्ला दिला आहे.
हेही वाचा - LIVE : मुख्यमंत्र्यांना अतिवृष्टीची खरी परिस्थिती माहिती नाही - देवेंद्र फडणवीस