चंद्रपूर - जिल्ह्यातील गर्द जंगल आणि विपुल प्राणीविश्व अनुभवण्याची संधी वन विभागाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता जिल्ह्यात संरक्षीत जंगलात सफारी सुरू केली जाणार आहे. यासाठी नव्याने सिंदेवाही, राजुरा आणि चोरा अशा तीन क्षेत्रांची निवड करण्यात आली. पुढील महिन्यात ही सफारी इथं सुरू होणार आहे. या तिन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाघासोबतच इतर वन्यजीव आहेत. त्यामुळं या तिन्ही सफारी पर्यटकांना पर्वणी ठरणार आहेत. शिवाय ताडोबाच्या पर्यटनातून स्थानिकांना जसा रोजगार उपलब्ध झाला, तसाच रोजगार या नव्या सफारीच्या ठिकाणी पण होणार आहे.
पर्यटनातून रोजगार निर्मिती हा मोठा उद्देश-
पर्यटनातून रोजगार निर्मिती हा मोठा उद्देश यामागे आहे. प्रायोगिक तत्वावर चंद्रपूरलगत कारवा जंगलात 26 जानेवारीपासून सफारी सुरू करण्यात आली आहे. त्याला पर्यटकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे आता नव्या तीन क्षेत्रात सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. पट्टेदार वाघासोबतच घनदाट जंगलाचा आनंद आता पर्यटकांना घेता येणार आहे. पट्टेदार वाघ बघण्यासाठी पर्यटक देश-विदेशातून ताडोबात येत असतात. मात्र त्यात प्रवेश क्षमता मर्यादित आहे. पर्यटकांचा हिरमोड होऊ नये म्हणून नंतर बफर क्षेत्रात सफारी सुरू करण्यात आली. पण तिथेही गर्दीचा कडेलोट झाला.
सफारीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात-
पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने स्थानिकांना आणि सर्वसामान्य पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद आर्थिकदृष्ट्या परवडेनासा झाला. त्यामुळं यावर तोडगा म्हणून आता संरक्षित जंगलात कमी शुल्कात सफारी सुरू करण्याची योजना आखण्यात आली. ताडोबा व्यवस्थापनाचा या सफारीशी काही संबंध नसला तरी येत्या काळात ही सफारीसुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाइन करण्याचा विचार आहे. विशेष म्हणजे नव्या जंगल सफारीला पर्यटक स्वतःचे वाहन नेऊ शकतात. त्यामुळे जिप्सीचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. सध्या या सफरीला 500 रूपये प्रवेश शुल्क आणि गाईडचे 350 रुपये, असे 850 रुपये मोजावे लागतील. हे शुल्क नाममात्र असल्याने सर्वसामान्य पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे. या सफारीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, पुढील महिन्यात त्याची सुरूवात केली जाणार आहे.
हेही वाचा- हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर , संकटाची ही बोलकी छायाचित्रे...