चंद्रपूर - विद्यार्थ्यांना कलेचे दालन उघडे करुन दिले तर या संधीचा ते किती चांगला उपयोग करतात याचे आदर्श उदाहरण चंद्रपूरमध्ये आज (शनिवारी) दिसून आले. बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने बांबू पासून गणपती बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत या मुलांना बांबूचे तुकडे देण्यात आले. त्यानंतर या मुलांनी बांबूपासून आपल्या मनातील 'बाप्पा' साकारले.
गणेशचतुर्थीची लोक आतुरतेने वाट बघत असतात. त्यातही बाळगोपाळांना तर याचे विशेष आकर्षण असते. या बाळगोपाळांना आपल्या बाप्पाविषयी कलेच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करता यावे ही कल्पना बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांच्या डोक्यात आली. आपल्या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले. शाळेतील मुलांना बांबूचे साहित्य पुरवायचे आणि त्यातून त्यांना गणेशाची मूर्ती साकारायला लावायची. ही कल्पना अनेक शाळेत जाऊन समजावून सांगण्यात आली. शाळा आणि विद्यार्थ्यांनी याला प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील बाप्पा बांबूच्या माध्यमातून साकारण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. काहींनी मुलांनी तर एखाद्या अस्सल कलाकाराला लाजवेल अशा मूर्ती बनवल्या.
मागील वर्षीही बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्यावतीने अशाच स्वरुपाचा एक उपक्रम राबवला होता. मात्र, यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त म्हणजे पंधरा शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. सकाळी साडेअकरा वाजता पासून सुरू झालेली ही स्पर्धा दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुरू होती. यात सर्वोत्कृष्ट मूर्ती साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. ज्याची पाहणी केंद्रसंचालक राहुल पाटील यांनी केली. एकूणच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य वाव देणारा हा उपक्रम नक्कीच आशादायी असा आहे.