चंद्रपूर- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्दभवलेल्या संकटकाळात देशातील प्रत्येक नागरिक आपल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहे. राजुरा येथे शिकणाऱ्या विशाल शेंडे या विद्यार्थ्याने केलेली मदत देखील लाखमोलाची ठरली आहे. तो शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथे शिक्षण घेत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक असलेल्या विशाल शेंडे या विद्यार्थ्याने रोजगार हमीच्या कामातून मिळालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. त्याने दिलेली रक्कम फार मोठी नसली तरी त्याने याद्वारे सर्वांची मने जिंकली आहेत.
रोजगार हमीच्या कामावर रखरखत्या उन्हात राबून हातात आलेली एक हजार रुपयांची मजुरी विशालने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली. विशालने इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या वरुर या खेड्यात राहणाऱ्या विशालची ही कृती कौतुकास पात्र ठरली आहे.
महाविद्यालयात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात विशाल सहभाग घेत असतो. गुवाहाटी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय एकता शिबिरात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व विशालने केले आहे. त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने गावात सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती केली. वृक्षारोपण, मतदार जनजागृती, यासारख्या उपक्रमात विशाल सहभाग घेत असतो.
देशावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. देशातील नागरिक त्यांच्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. विशालने लॉकडाऊन काळात गरजू व्यक्तींना मास्कचे वितरण केले. मात्र, रखरत्या उन्हात मजुरी करुन हातात आलेली रक्कम देशसाठी देणारा विशाल हा विध्यार्थी इतरांपेक्षा वेगळा ठरला आहे.