चंद्रपूर : दिवसेंदिवस आता शेतीचं आधुनिकीकरण होत आहे. पूर्वी जे काम करायला अनेक दिवस लागायचे ते काम आता अवघ्या काही तासांत होऊ शकतं, इतकी प्रगती आता या क्षेत्रात झालीय. चंद्रपूर येथे सध्या कृषी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात कृषी विषयक तीनशेहून अधीक स्टॉल आहेत. यात एक यंत्र ज्याला 'इलेक्ट्रिकल बैल' संबोधलं जातं आहे ते आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.
असं पडलं 'इलेक्ट्रिक बैल' हे नाव : बैलांच्या मदतीनं पेरणी, तण काढणं, माती लावणं आणि फवारणीचं काम केलं जातात. हेच काम हे यंत्र करतं. एका कृषी प्रदर्शनात हे यंत्र ठेवलं असता काही शेतकऱ्यांनी याचं काम बघून हा तर 'इलेक्ट्रिक बैल' असल्याचं संबोधलं. यानंतर याला 'इलेक्ट्रिक बैल' नावानेच प्रसिद्धी मिळाली.
ही आहे खासियत : हे एक इलेक्ट्रिक व्हेईकल असून याची चार्जिंग करण्यासाठीची सुविधा आहे. एकेरी बॅटरी चार्ज करण्यास अडीच तास लागतात, तर दुहेरी बॅटरी चार्ज करण्यात चार तास लागतात. एकदा चार्ज केल्यास हे यंत्र सात तास शेतात चालू शकतं. याचा खर्च हा एक दिवसाचा केवळ 50 ते 60 रुपये आहे. या यंत्रच्या समोर फवारणी करण्यासाठी दोन पाईप दिले आहेत. त्याला जोडून रॉड देखील आहेत. त्याला जोडल्यास तब्बल 12 फुटपर्यंत फवारणी करता येऊ शकते. शेतात काम करत असताना शेतकऱ्यांचा विरंगुळा व्हावा याची देखील सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. ब्लूटूथ आणि एफएम रेडीओची देखील सुविधा यात करण्यात आली आहे. यंत्रात कॅमेरा देखील लावण्यात आला आहे. त्यामुळं रस्त्यात पूढे काय आहे हे शेतकऱ्याला सहज दिसू शकतं. तसेच या यंत्रात जीपीएस देखील लावण्यात आला आहे. त्यामुळं त्याला कुठल्याही आधुनिक यंत्राला जोडलं जाऊ शकतं.
शासनाकडून मिळतं 50 टक्के अनुदान : सध्या याची किंमत ही साडे तीन लाख अशी आहे. मात्र हे यंत्र घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 50 टक्के अनुदान शेतकऱ्याला दिलं जातं. कृषी क्षेत्रांत महत्वपूर्ण योगदान देणारे जावेद पाशा हे चंद्रपूर येथील कृषी महोत्सवात आले असताना त्यांना देखील या यंत्राविषयी माहिती घेण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी या यंत्राच्या सर्व बाबी उत्सकतेनं जाणून घेतल्या.
हेही वाचा :