चंद्रपूर - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार -
एखाद्या प्रसंगाने आयुष्याला कलाटणी मिळते, असे म्हणणे धाडसाचे आहे. कारण प्रत्येक दिवस, मित्र, पुस्तके आपल्याला प्रत्येक दिवशी शिकवत असतात, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, कधीकधी आयुष्याचा फंडा इतका सहजपणे गवसतो ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसावी. ज्यामुळे आपला दृष्टिकोन बदलतो, शिस्त लागते, जीवनात येणारा गुंता सोडवायचे बळ मिळते. असाच एक 'गुरुमंत्र' मला मिळाला. आयएएसच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या शारीरिक प्रशिक्षकांनी सांगितलेला हा फंडा आता त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झाला असल्याचे ते म्हणाले.
कोरोनाचा काळ हा कसोटीचा काळ आहे. एक जिल्ह्याचा प्रमुख म्हणून तर ही जबाबदारी कित्येक पटीने वाढते. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास जरादेखील कुचराई झाली तर त्याचे फार मोठे परिणाम घडतात आणि जिल्हाधिकारी म्हणून त्याची जबाबदारीही घ्यावी लागते. मात्र, अशी कोणतीही धक्कादायक बाब जिल्ह्यात घडली नाही. 'पैर गरम, पेट नरम और सिर ठंडा'. म्हणजेच नेहमी कृतिशील आणि कार्यतत्पर असावे, आहार संतुलित असावा, आणि कितीही कठोर स्थिती असली तर चित्त मात्र स्थिर आणि शांत ठेवावे, हेच त्या मागचे गुपित आहे.
डॉ. खेमणार जेव्हा सनदी अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत होते तेव्हा त्यांचे शारीरिक प्रशिक्षक रावत हे आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना हीच शिकवण द्यायचे. अधिकारी झाल्यावर जी आव्हाने समोर येतात त्याचा सामना करण्याची ही 'फिलॉसॉफी'च होती म्हणून त्यांना ही शिकवण रुचली आणि त्यांनी ती अंगिकारली.
सध्या कोरोनाची स्थिती हाताळताना कुठल्याही अधिकाऱ्याची कसोटी लागत आहे. संपुर्ण जिल्ह्यात कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे, माहिती घेणे, प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्याची आखणी करणे, वेगवेगळ्या बैठकी घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माहितीची देवाणघेवाण करणे, लोकप्रतिनिधींशी चर्चा करणे, या सर्व गोष्टी अधिकाऱ्यांना कराव्या लागत आहेत. सोबत अनेक समस्या घेऊन तक्रार करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा ओघ, त्यांचे म्हणणे ऐकून, योग्य मार्गदर्शन करून त्याचा पाठपुरावा करणे तसेच आपले दैनंदिन सामान्य कामकाजही योग्यरितीने पार पाडणे, यासाठी सुटीच्या दिवशीही कर्तव्यावर असणे, हे सर्व करणे असामान्य बाब आहे. मात्र, असे करताना डॉ. खेमणार यांनी आपला संयम कधीही ढळू दिला नसल्याचे सांगितले.
कितीही कठीण स्थिती असली तरी आपल्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य ते कधीही ढळू देत नाही. परिस्थिती ही बाहेरून आलेली, निर्माण झालेली असते. तिची निवड करणे आपल्या हातात नसते. मात्र, तिचा सामना करताना आपण शांत आणि संयमी असलो तर त्यावर प्रभावीपणे मात करता येते, हे डॉ. खेमणार यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. म्हणूनच जेव्हा संचारबंदीच्या काळात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव होत असताना मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. याचे श्रेय जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांना जाते म्हणजेच अशी स्थिती हाताळण्याचे बळ देणाऱ्या त्यांचे शारिरीक प्रशिक्षक रावत यांच्या गुरुमंत्राला जाते.
मनोज शर्मा यांचा कानमंत्र -
डॉ. खेमणार हे कोल्हापूर येथे उपविभागीय अधिकारी असताना त्यांना तेथील जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज शर्मा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे शर्मा चंद्रपूरचेदेखील जिल्हा पोलीस अधीक्षक राहिले आहेत. ते म्हणायचे की, कुठलाही तणाव आपण घ्यायचा नाही. आपण कुणाच्याही मेहरबानीने अधिकारी बनलो नाही तर संविधानाने आपल्याला इथवर आणले आहे. संविधानाचे रक्षण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली येऊन काम करण्याचा प्रश्नच नाही. या कानमंत्राने सक्षम आणि दक्ष अधिकारी म्हणून खेमणार यांचा अधिक आत्मविश्वास वाढविण्याचे काम केले, या शब्दात डॉ. खेमणार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.