चंद्रपूर - किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांचा निर्घृणपणे खून केल्याची घटना कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नांदगाव (सुर्या) येथे घडली. शंकर फोफरे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन तासात आरोपी मुलाला अटक केली.
शंकर यांना एकुलता एक राहुल नावाचा मुलगा आहे. त्यांचा पत्नी वनितासह सुखी संसाराचा गाडा चालू होता. गावापासून दोन किमी अंतरावर कोराडी गावानजीक असलेल्या स्वतःच्या शेतात शंकर दररोज प्रमाणे आपल्या राहुल मुलासह काम करण्यासाठी गेले. तूर पिकाच्या कापणीचे काम सकाळ पाळीत केल्यानंतर पत्नीने दुपारची आणलेली न्हारी करीत असताना वडिल व मुलात शाब्दिक बाचाबाची झाली. तेव्हा रागात राहुलने विळ्याने वडिलांच्या डोक्यात वार करीत व गळा कापला. यानंतर मृत्यू झालेल्या वडिलांचा मृतदेह घटनास्थळावरून काही अंतरावर कपाशीच्या पिकात ओढत नेला व तो बैलाला चारा चारण्यासाठी दुसरीकडे निघून गेला.
कापसाची वेचणी करीत असलेली पत्नी वनिता दुपारच्या न्हारीला आपल्याला आवाज दिला नाही म्हणून ती पतीकडे आली असता घटनास्थळी जेवणाचे डब्बे इतरत्र पडलेले व रक्ताच्या खुणा दिसल्या. मुलाला आवाज देऊन पतीसंबंधी विचारणा केली असता वडिलांचा शोध घेत असल्याचा बहाना करीत वडील शेताच्या कडेला मृत अवस्थेत पडून असल्याचे आईला दाखविले. यानंतर पत्नी वनिताने हंबरडा फोडला.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक धावत आले. सदर घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना मिळताच नांदा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी गडचांदूर पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांच्या साहायाने घटनेची माहिती घेऊन अवघ्या तीन तासांत आरोपीला ताब्यात घेतले.
घडलेल्या घटनेची माहिती राहुलला विचारली असता त्यांने गुन्ह्याची कबुली दिली. गडचांदूर पोलीस स्टेशन येथे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शांत व संयमी स्वभावाने नांदगाव येथे परीचित असलेले शंकर फोफरे यांच्या हत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे. एकुलत्या एक पोटच्या मुलांकडून जन्मदात्याची हत्या झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बेलारा गोंडमोहळी येथे प्रर्यटकांसाठी नवे प्रवेशद्वार
हेही वाचा - पोलीस महानिरीक्षकांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील कोंबडबाजार बंद