चंद्रपूर - कोरोनामुळे लघु आणि मध्यम उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. कच्चा मालाचे दर गगनाला भिडले आहे. अशा वेळी हे उद्योगजगत आपल्या अस्तित्त्वाची लढाई लढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या उद्योगांना तारण्याची गरज असून आगामी अर्थसंकल्पात याविषयी काही महत्त्वाचे निर्णय येण्याची अपेक्षा आहे, असे मत चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी व्यक्त केले आहे.
उद्योग क्षेत्र अद्यापही धक्क्यातून सावरलेले नाही -
लघु आणि मध्यम श्रेणीचे उद्योग आधीच मोठ्या अडचणींचा सामना करत होते. यातच देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि संपूर्ण देश ठप्प पडला. यामुळे अनेक उद्योग बंद पडले किंवा त्यांना बंद करावे लागले. त्यामुळे 30 टक्क्यापेक्षा जास्त कामगार आणि इतर कर्मचारी बेरोजगार झाले. आता लॉकडाऊन नाही. मात्र, अजूनही या धक्क्यातून हे क्षेत्र सावरलेले नाही. अजूनही अनेक उद्योगांना व्यवसायासाठी बाजार उपलब्ध झालेला नाही. कच्चा मालाचे दर खूप महाग झाले आहे. कोळसा, स्टील, प्लास्टिक, लोखंडाचे दर इतके वाढले आहेत की, लघु उद्योगांच्या आवाक्याच्या बाहेरचे झाले आहे. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन या क्षेत्राला तारले पाहिजे, अन्यथा ही स्थिती आणखी तळाला जाईल. सरकारने लघु उद्योगांना करात सूट द्यायला हवी, सोबतच बँकांच्या व्याजात कपात करायला हवी. आज जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल, तर ही सर्व पाऊले उचलणे आवश्यक आहेत. तसेच आयकर भरण्यातदेखील 10 टक्के सूट द्यायला हवी, तरच हे क्षेत्र तग धरू शकेल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - अष्टविनायकाचे दर्शन करून परतताना भक्तांच्या बसचा अपघात, 25 जखमी