चंद्रपूर - सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आहे. यावर आळा बसावा म्हणून सर्वत्र संचारबंदी असून लॉकडाऊन सुरू आहे. अशाही परिस्थितीमध्ये दारूची तस्करी करणारे गप्प बसताना दिसत नाहीत. लॉकडाऊनमध्ये दारुची तस्करी करणाऱ्या 6 जणांना विरुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 3 वेगवेगळ्या कार्यवाहीत एकूण 2 लाख 43 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संतोष राठोड, विनोद पुप्पलवार, संजय लोखंडे, श्रीधर कुर्वतकर, प्रेम सातपुते, आकाश भोयर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
लॉकडाऊनमुळे राजुरा तालूक्यात होणारी दारूची तस्करी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे तळीरामांचा गळा कोरडा पडला आहे. वाट्टेल त्या किंमतीत दारू खरेदी करण्यासाठी तळीरामांची धडपड सुरू आहे. याचाच फायदा काही अवैधरित्या हातभट्टीद्वारे दारू काढणारे घेत आहेत. या प्रकाराची माहिती विरूर पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली. या कार्यवाहीत सुमारे 18 हजार रुपये किंमतीची 130 लीटर गावठी दारू आणि या कामी वापरण्यात आलेल्या 2 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 3 दुचाकी, असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी, उपनिरीक्षक सदानंद वडतकर, विजय तलांडे, प्रमोद मिलमीले, भगवान मुंडे, संघपाल गेडाम, अशोक मडावी, प्रल्हाद जाधव, माणिक वागदरकर, विजय मुंडे, पवार आणि कुलसंगे यांनी केली.